रांगणागड


सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्वेला कोल्हापूर-सिंधुदुर्गच्या सीमेवर स्वराज्याचे रक्षण करणारा, स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणारा गौरवशाली किल्ला म्हणजे रांगणागड. रांगणागडाच्या भोवताली हळदीचे नेरुर, चाफेली, महादेवाचे केरवडे, निळेली, गिरगाव, कुसगाव व नारुर ही गावे आहेत. तसेच घाटमाथ्यावरील तांब्याची वाडी, हणमंते ही गावे वसलेली आहेत. रांगणागडाच्या माथ्यावरून रात्रौ वेंगुर्ले येथील दीपगृह, सावंतवाडी, कुडाळदरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्गावरील रहदारी, ओरोस येथील सिंधुदुर्गनगरी आदी भाग दिसतो. म्हणूनच कोकण प्रांतावर टेहळणी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी रांगणागडाला महत्त्वाचे स्थान दिल्याचे दिसून येते.

शिलाघरवंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) याने इ. स.११८७ च्या सुमारास रांगणागडाचे काम पूर्णत्वास नेले. समुद्रसपाटीपासून सुमारे ७७० मीटर उंचीवर असलेल्या या गडाने भोज राजाच्या पिढय़ानंतर बहामणी राजा महंमद गवाण, आदिलशहा, शिवरायांचा सावत्र भाऊ व्यंकोजी, शिवाजी महाराज, विजापूरकर व शेवटी शिवाजी महाराज अशा अनेक राजवटी पाहिल्या आहेत.
या गडाचा यशवंत दरवाजा, गणेश दरवाजा, हनमंत दरवाजा, दिंडी दरवाजा, निंबाळकर दरवाजा असे विस्तीर्ण दरवाजे आहेत. हे सर्व दरवाजे आता पुरेसे जीर्ण झालेले आहेत. रांगणागडाचे दोन मुख्य बुरुज असून एक चिक्याची वाडी या भागात तर दुसरा दक्षिण दिशेला यशवंत दरवाजानजीक आहे. हे दोन्ही बुरुजसुद्धा ढासळलेले आहेत.
चिकेवाडीकडील बुरुजाचे दगड कोसळून त्याच्या पायथ्याशी ढीग जमा झालेला आहे. गडाच्या यशवंत दरवाजा ते गणेश दरवाजापर्यंत दक्षिण उत्तर अशी मजबूत तटबंदी करण्यात आली होती. दरडी कोसळल्यामुळे या तटबंदीचा बराचसा भाग नष्ट झाला आहे.
गडाच्या मध्यावर रांगणाईदेवीचे मंदिर आहे. या रांगणाई देवीवरूनच या गडाला रांगणागड हे नाव पडले. या मंदिराच्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे. रांगणाईदेवीच्या मंदिरासमोर आकर्षक दीपमाळ आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केल्याची नोंद आहे. या दोन्ही मंदिराची व दीपमाळेची पडझड झाली होती. त्यांची काही वर्षापूर्वी नारुर गावच्या ग्रामस्थांनी दुरुस्ती केली होती. तसेच गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील खानपूर येथील केशवनाथ तरुण मंडळाने या दोन्ही मंदिरांची डागडुजी करून रंगरंगोटी केली.

हनुमान मंदिरावर पत्र्यांचे छप्पर व रांगणाई मंदिरासमोरच्या जागेत पत्र्यांच्या छप्पराचा सभामंडप तयार केला.
रांगणाई मंदिराव्यतिरिक्त गडावर लिंगेश्वर व हनुमंत मंदिर सुस्थितीत आहेत. गणेश, जैन, वासुदेव, धाराबाई या मंदिराचे आता फक्त भग्नावशेष उरले आहेत. रांगणाई मंदिरानजीकच बारमाही पाणी असणारा शिवकालीन तलाव आहे. जमिनीपासून सुमारे २२०० फुटांपेक्षा उंचीवर उपलब्ध करण्यात आलेला जलस्त्रोत त्या काळातील तंत्रज्ञानाची आपणास प्रचिती देतो. या तलावाच्या खोदकामाच्या वेळी विशाल आकाराचे खडक कोरून खडकाचे दगड गडाच्या बांधकामास वापरण्यात आले असे सांगण्यात येते.
पाणीपुरवठय़ासाठी गडावर सुमारे ३६० हून अधिक विहिरी बांधण्यात आल्या होत्या असे जाणकार सांगतात. यापैकी बहुतेक विहिरी काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत.
निंबाळकर वाडय़ातील एकमेव विहीर सुस्थितीत असून थोडय़ा डागडुजीने ही विहीर पाण्यासाठी पुन्हा वापरण्यास येऊ शकते. याच विहिरीला ‘घोडेविहीर’ असे म्हटले जाते. कारण या विहिरीला आत उतरण्यास पाय-या आहेत. गडावरील दोन तळ्यांपैकी दुसरे तळे हळदीचे नेरुर येथील कडेलोट पॉइंटजवळ आहे. या तळ्याच्या एका बाजूला शिवलिंगाची घुमटी आहे. दुसरीसमोर नंदीची मूर्ती आहे. तळ्यात पाणी असताना हे तळे आकर्षक दिसते. परंतु तळ्यात गवत वाढल्यामुळे तसेच तळ्यात माती साचल्याने तळ्याची आकर्षकता कमी झालेली आहे.
हळदीचे नेरुरकडील दरवाजाकडे षटकोनी विहीर आहे. या विहिरीला ‘तुपाची विहीर’ असे म्हटले जाते. निंबाळकर वाडय़ात एक भुयारी मार्ग आहे. हा पश्चिमेकडे वळला आहे. मालवण किल्ल्यात हे भुयार उघडते असे काही जण सांगतात. आता हे भुयार दगड टाकून बुजवण्यात आलेले आहे. रांगणागडाच्या दक्षिणेला महादेवाचे केरवडे व हळदीचे नेरुर या गावच्या सीमेवर सोंड बुरुज आहे. या बुरुजावर मनोहर मनसंतोष गडावर नजर ठेवण्यासाठी भुयारी बांधकाम केलेले आढळते. याचा शेवटचा भाग चाळीस वर्षापूर्वी कोसळलेला होता.
गेल्या वर्षापासून या भुयारी मार्गाच्या विरुद्ध बाजूस महादेवाचे के रवडे गावाच्या दिशेने अजून एक भुयारी मार्ग आढळून आला आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूस असे भुयारी मार्ग असल्याचे दुर्गप्रेमींना माहिती नसल्याने तसेच या भुयारी मार्गाकडे जाणारी वाट अवघड व धोक्याची असल्याने या ठिकाणी जाण्यास लोक भीत असत. गेल्या वर्षी पावसाळ्यात या ठिकाणची माती वाहून गेल्याने या भुयारी मार्गावरून दुस-या भुयारी मार्गाच्या कोसळलेल्या भागाची कल्पना आपणास येते. रांगणाई मंदिर व घोडे विहीर या ठिकाणी आपणास काही शिलालेख आढळतात. त्यावर शिवकालीन मजकूर आहे. गडाच्या उत्तरेकडे निंबाळकर वाडा आहे. या राजवाडय़ाच्या इमारती कोसळलेल्या आहेत. परंतु त्यांची डागडुजी करता येण्यासारखी आहे.
निसर्गाने मुक्त हस्ते बहाल केलेल्या सौंदर्याने नटलेला हा ऐतिहासिक गड गेली साडेआठशे वर्षे ऊन, वारा, पाऊस यांच्याशी झगडत उभा आहे.

सर्व फोटो सौजन्य: कोकण सर्च

Advertisements